इंडिगो विमानातून इंदौरसाठी निघालेला प्रवासी इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी घातलेल्या गोंधळांमुळे चक्क नागपूरला पोहोचला आहे. या प्रवाशाकडे इंदौरचे तिकीट होते मात्र तो नागपूरच्या विमानात बसला विशेष म्हणजे नागपूर विमानतळावर पोहोचपर्यंत ही बाब एकाही विमान कर्मचाऱ्याच्या लक्षात आली नाही, त्यामुळे या प्रकरणात इंडिगोनं माफी मागितली असून या प्रकरणाच्या अधिक चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रवाशानं दिल्ली ते इंदौर असे विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. इंडिगोच्या ‘६ ई ६५६’ विमानानं तो इंदौरला जाणार होता. पण, हा प्रवासी ‘६ ई ७७४’ या नागपूरला जाणाऱ्या विमानात बसला. हा प्रवासी नागपूर विमानतळावर उतरेपर्यंत इंडिगोच्या एकाही कर्मचाऱ्याला हा गोंधळ लक्षात आला नाही त्यामुळे इंडिगोच्या एकंदरच सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. इंडिगोनं सुरक्षा यंत्रणेत झालेल्या या मोठ्या चुकीमुळे माफी मागितली आहे. या प्रकरणात तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं इंडिगोनं सांगितलं आहे. नागरी विमान उड्डयन महासंचालनालयाच्या नियमांचा भंग केल्यानं आता याप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विमानात प्रवेश करीत असताना प्रत्येक प्रवाश्याचा बोर्डिंग पास पुन्हा एकदा तपासण्यात येतो. त्यामुळे बोर्डिंग पास तपासताना प्रवासी चुकीच्या विमानात आल्याचे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येणे आवश्यक होते पण, दुर्दैवानं एकाच्याही ते लक्षात आले नाही म्हणूनच या प्रकरणानंतर इंडिगोच्या सुरक्षायंत्रणेबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली आहे.