आणीबाणी दरम्यान, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बहुतेक विरोधकांवर अटकेची कारवाई केली होती. त्यांच्या अनुपस्थितीत दोन तृतीयांश बहुमत सिद्ध करुन संविधानात अनेक बदल केले. तसेच माध्यमांवरही कडक निर्बंध आणले, या अर्थाने इंदिरा गांधी जर्मनीचा हुकुमशहा हिटलरपेक्षाही दोन पावले पुढे होत्या, अशा भाषेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आणीबाणीचा निषेध नोंदवताना इंदिरा गांधींवर हल्लाबोल केला. आपल्या ब्लॉगवर लिहिलेल्या लेखात त्यांनी हा उल्लेख केला आहे.

२५ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशावर लादण्यात आलेल्या आणीबाणीची आठवण काढताना जेटलींनी ब्लॉगवर ६ पानांचा लेख लिहीला आहे. इमर्जन्सी रिव्हिजिटेड पार्ट-२ नावाच्या या ब्लॉगमध्ये त्यांनी ‘आणीबाणीचा अत्याचार’ असा उल्लेख केला आहे.

इंदिरा गांधी या हिटरपेक्षा दोन पावले पुढे होत्या असे सांगताना जेटली लिहीतात की, इंदिरा गांधींनी माध्यमांवरही बंदी आणली होती. त्यांनी संविधान आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातही बदल केला होता. या कायद्यानुसार, पंतप्रधानांच्या निवडीला कोर्टात आव्हान देता येत नव्हते. तसेच इंदिरा गांधींच्या बेकायदा निवडीला या कायद्यानुसार योग्य ठरवण्यात आले होते. हिटलरपेक्षा अनेक पावले पुढे टाकत इंदिरा गांधींनी भारताला घराणेशाहीच्या लोकशाहीत बदलले होते.

लेखात जेटली पुढे म्हणतात की, इंदिरा गांधी आणि हिटलरने लोकशाहीला हुकुमशाहीत बदलण्यासाठी संविधानाचा वापर केला. इंदिरा गांधींनी मुलभूत हक्कांचे उल्लंघन करीत आणीबाणी लागू केली. २६ जून १९७५ रोजी इंदिरा गांधींनी कलम ३५९ अंतर्गत जनतेचे अधिकार आणीबाणीच्या आड दाबून टाकले. देशात या काळात अतिशय भितीदायक वातावरण होते. विरोधी पक्षांचे नेते इंदिरा गांधींविरोधात रस्त्यावर उतरले होते. धरणे आंदोलने केली जात होती. या काळात मला स्वतःला एका आठवड्यासाठी तुरुंगाची हवा खावी लागली होती.

हिटलरने आपल्या दबावाच्या धोरणांचा वापर करीत विरोधकांच्या खासदारांना अटक केली होती. तसेच आपल्या अल्पमतातील सरकारला संसदेत दोन तृतीयांश बहुमताच्या सरकारमध्ये परावर्तीत केले होते. याचप्रकारे इंदिरा गांधींनीही विरोधकांवर अटेकची कारवाई करुन संसदेत आपले दोन तृतीयांश बहुमत सिद्ध करीत संविधानात अनेक बदल केले. संविधानातील ४२वी घटना दुरुस्ती करुन हायकोर्टात रिटपिटिशन दाखल करण्याचे अधिकार कमी केले होते. डॉ. आंबेडकरांनी संविधानात टाकलेला हा महत्वाचा भाग होता. त्याशिवाय संविधानात केलेले बदल न्यायालयीन चौकशीच्या कक्षेत येऊ नये यासाठी कलम ३६८ मध्ये देखील इंदिरा गांधींनी बदल केला होता.

आपल्या या ब्लॉगमध्ये अरुण जेटलींनी संजय गांधींवरही टीका केली. त्यांनी लिहीले की, संजय गांधी हुकुमशाही आणि राजकारण यातील अंतर समजू शकले नाहीत, त्यांनी गरीबांवर अनेक अत्याचार केले, त्यांच्या नसबंदीचे आदेशही काढले.

२५ जून १९७५ रोजी मध्यरात्री आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. पुढे ही आणीबाणी २१ मार्च १९७७ पर्यंत सुरु होती. यावेळी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या शिफारसीवर भारतीय संविधानातील कलम ३५२नुसार देशात आणीबाणीची घोषणा केली होती.