नवी दिल्ली : सध्या कैदेत असलेली माध्यमसम्राट इंद्राणी मुखर्जी हिला एका विशेष न्यायालयाने गुरुवारी माफी दिली आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम व त्यांचे पुत्र कार्ती हे दोघे आरोपी असलेल्या आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणात अभियोजन पक्षाला मदत करण्यासाठी माफीची साक्षीदार होण्याची परवानगी दिली.

या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याबाबतच्या कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी आणि तिची संमती देण्यासाठी ११ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याकरिता इंद्राणीच्या नावे वॉरंटही जारी केले.

मुलगी शीना बोरा हिच्या खून प्रकरणात इंद्राणी सध्या मुंबईतील भायखळा कारागृहात कैद आहे. याच प्रकरणात तिचा पती पीटर मुखर्जी हाही तुरुंगात आहे. पूर्वीच्या विवाहसंबंधातून झालेल्या मुलीचा, शीनाचा एप्रिल २०१२ मध्ये खून करण्यासाठी कट रचल्याच्या आरोपाखाली दोघांविरुद्ध खटला सुरू आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात आपण स्वेच्छेने माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे इंद्राणीने सांगितल्यानंतर, विशेष न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी तिला माफ केले. २००७ साली आयएनएक्स मीडियाला परदेशातून निधी मिळण्यात विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) मंजुरी देण्याबाबतच्या ३०५ कोटी रुपयांच्या प्रकरणात चिदंबरम पिता-पुत्र व इंद्राणी यांची नावे आली होती.

या प्रकरणात संभाषणांच्या स्वरूपात पुरावा आढळला असून, केवळ इंद्राणी मुखर्जीला त्याबाबत माहिती आहे सीबीआयने म्हटले होते.