काश्मीरमधील तांगधर सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन दहशतवाद्यांना भारतीय लष्कराच्या जवानांनी रविवारी सकाळी कंठस्नान घातले. दोन दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौकीवर हल्ला करण्यात या तिघांचा समावेश असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये भारतीय हद्दीत घुसताना तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याच्या वृत्तास लष्करी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. शुक्रवारी याच दहशतवाद्यांनी बीएसएफच्या चौकीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात बीएसएफचे तीन जवान जखमी झाले होते. रविवार सकाळी ते दहशतवादी पुन्हा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षा दलाने त्यांचा खात्मा केला. मृत तिन्ही दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आला आहे.
सीमेवर आणखी दहशतवादी असण्याच्या शक्यतेवरून सुरक्षा दलाकडून अजूनही ऑपरशेन सुरू आहे. सध्या जम्मू  खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या तणावाचा फायदा घेऊन गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे बोलले जात आहे. नुकतेच कुपवाडा येथील उरी सेक्टरमध्ये दहशतवादी लपून बसले होते. तसेच काही दिवसांपूर्वी नौगाम सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं. सुरक्षा  दलाकडून घुसखोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सीमा रेषेवर अतिरिक्त काळजी घेतली जात आहे.