राजनाथ सिंह यांचा ‘शेजारी देशांना’ स्पष्ट संदेश
भारतासोबत संबंध सुधारायचे असतील तर दहशतवाद, घुसखोरी आणि सीमेचे उल्लंघन थांबवावेच लागेल, असे ठामपणे सांगून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान व चीन यांना स्पष्ट संदेश दिला.
आपल्या शेजारी देशांशी चांगले संबंध असावेत असा भारताचा नेहमीच प्रयत्न राहिलेला असून, आमची कुठलीही ‘विस्तारवादी’ महत्त्वाकांक्षा नाही. परंतु भारताशी अधिक चांगले संबंध ठेवण्यासाठी शेजारी देशांनी दहशतवाद व घुसखोरीला थारा देणे आणि सीमेचे उल्लंघन करणे थांबवावे, असे इंडो-तिबेटियन सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) येथे नव्याने बांधलेल्या शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर सैनिकांसमोर केलेल्या भाषणात राजनाथ सिंह म्हणाले.
आम्हाला चीन व पाकिस्तानसोबत अधिक चांगले संबंध हवे आहेत. त्यांच्यासोबतचे संबंध सुधारल्याशिवाय आशियात शांतता नांदू शकत नाही आणि उपखंडाची विकासाच्या मार्गावर वाटचाल होऊ शकत नाही. सीमावाद असो किंवा दहशतवादाचा मुद्दा असो, सर्व मुद्दे चर्चेतून सोडवले जाऊ शकतात असे मला वाटते. भारत हा शांतताप्रिय देश असून आम्ही केवळ आमच्या सीमांचे संरक्षण करू इच्छितो, असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
भारताने कधीही आपल्या सीमा विस्तारण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेली नसून भविष्यातही आम्ही तसे करणार नाही, अशी ग्वाही तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले राजनाथ सिंह यांनी दिली. सीमेवरील भारतीय नागरिकांवर सीमेपलीकडून तोफांचा मारा आणि गोळीबार होत असताना पाकिस्तानशी संवाद कसा होणार असे पत्रकारांनी विचारले असता राजनाथ म्हणाले की, मी कुठल्याही विशिष्ट देशाबाबत बोललेलो नाही. आम्हाला शेजाऱ्यांशी चांगले संबंध हवे आहेत हेच तत्त्व मी मांडले आहे, परंतु त्याचे दोन्ही बाजूंनी पालन व्हायला हवे. भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घ्यायला हवा. आयटीबीपी केवळ सीमांचे संरक्षण करत नसून, अफगाणिस्तानसारख्या देशात भारताच्या मालमत्तेचे रक्षणही करत आहे, असे सांगून गेल्या वर्षी हेरात येथील भारतीय दूतावासाचे दहशतवादी हल्ल्यापासून संरक्षण करण्यातील भूमिकेबाबत त्यांनी संघटनेचे कौतुक केले.