माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांना २०१९-२० या आर्थिक वर्षात तब्बल ३४.२७ कोटी रुपयांचं वेतन पॅकेज मिळालं. यापूर्वी गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०१८-१९ मध्ये त्यांचं पॅकेज २४.५७ कोटी रुपये होतं. कंपनीच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अहवालानुसार १६.८५ कोटी रुपयांचं वेतन, १७.०४ कोटी रुपयांच्या समभागांचे पर्याय आणि ३८ लाखांच्या अन्य रकमेचा सामावेश करण्यात आला होता.

इन्फोसिसचे अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी स्वत: आपल्या सेवांसाठी कोणतंही वेतन पॅकेज न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तर कंपनीचे चिफ ऑपरेटींग ऑफिसर यू.बी. प्रविण राव यांचं वेतन गेल्या वर्षात १७.१ टक्क्क्यांनी वाढून १०.६ कोटी रुपये झालं आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्यांचं वेतन ९.०५ कोटी रूपये होतं. फायनॅन्शिअल एक्स्प्रेसनं पीटीआयच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.

करोनाच्या संकटावर नजर

शेअरधारकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या वार्षिक अहवालात इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलिल पारेख यांनी करोनाच्या संकटावर आपण नजर ठेवून असल्याचं म्हटलं आहे. युरोपिय देश आणि अमेरिकेतील काही राज्य ही पूर्वपदावर येताना आपल्याला दिसत आहेत. आम्ही ग्लोबल टेलिकम्युनिकेशन्स, हाय टेक्नॉलॉजी आणि लाइफ सायंसेस क्षेत्रात स्थिरता आणि विस्तारावर लक्ष देत आहोत. सध्या जग या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आम्ही या वातावरणात आपल्या ग्राहकांच्या गरजांवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहोत आणि परस्पर सहकार्य वाढवण्यावरही जोर देत असल्याचे पारेख म्हणाले.

टीसीएसच्या सीईओ, एमडींच्या वेतनात कपात

टाटा कंसल्टंन्सी सर्व्हिसेजचे (TCS) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांच्या वेतनात २०१९-२० मध्ये १६ टक्क्यांची कपात केली असून ते आता १३.३ कोटी रुपये झालं आहे. तर विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आबिदअली नीमचवाला यांच्या वेतनात गेल्या आर्थिक वर्षात वाढत करण्यात आली असून ते ४४.२ लाख डॉलर्स इतके झाले आहे.