दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यावर शाई फेकण्यात आल्याचं समोर आलं आहे. सोमवारी ग्वालियर येथे एका कार्यक्रमादरम्यान हिंदू सेनेच्या एका कार्यकर्त्याने दोघांवर शाई फेकली.

घटनेनंतर कार्यक्रमात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं. या दरम्यान थोडावेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सोमवारी ग्वालियरमधील चेंबर ऑफ कॉमर्स भवन येथे संविधान बचाओ यात्रेसंदर्भातील एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

कार्यक्रमाचे समन्वयक देवाशीष जरेरिया यांनी प्रशासनाकडून या कार्यक्रमाची परवानगी घेतली होती. मात्र, कार्यक्रमाच्या एक दिवसापूर्वी म्हणजे रविवारी हिंदू सेनेने या कार्यक्रमाच्या विरोधात पुतळा जाळला होता. परिणामी कार्यक्रमात पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. हिंदू सेनेच्या 20 कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं होतं. सोमवारी जिग्नेश मेवाणी आणी कन्हेया कुमार चेंबर ऑफ कॉमर्स भवनात पोहोचताच एका तरुणाने दोघांच्या तोंडावर शाई फेकली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.  मुकेश पाल असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. मात्र, कार्यक्रमाच्या आयोजकांकडून या प्रकरणात त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आलेली नाही.