पेगॅसस पाळत प्रकरणी काँग्रेस नेते कमलनाथ यांची मागणी
पेगॅसस पाळत प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केली आहे. इस्राायलचे एनएसओ संस्थेचे पेगॅसस हे स्पायवेअर काही पत्रकार, राजकीय व सामाजिक नेत्यांच्या मोबाइलमध्ये सोडून त्यांच्यावर पाळत ठेवण्याच्या या प्रकरणात लोकांच्या व्यक्तिगततेवरच हल्ला झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले, की सरकारने पेगॅससचा वापर केला नाही असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे. पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पाळत ठेवल्याच्या आरोपाचा केंद्राने इन्कार केला आहे. पण केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली किंवा मोदी यांच्या सुरक्षेच्या नावाखाली हे स्पायवेअर खरेदी केल्याबाबत खुलासा करावा. इस्राायलच्या एनएसओ या कंपनीकडून हे सॉफ्टवेअर खरेदी न केल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करावे. लोकांच्या खासगी जीवनात डोकावण्याचा हा प्रकार असून त्याची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली करण्यात यावी. विरोधी पक्षांच्या सल्ल्याने या न्यायाधीशाची नियुक्ती चौकशीसाठी करण्यात यावी. फ्रान्सने या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत तसेच आपल्या सरकारनेही चौकशीचे आदेश द्यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

इंटरनॅशनल मीडिया कन्सर्टियम या संस्थेने रविवारी म्हटले होते, की काही मंत्री, पत्रकार, विरोधी नेते, न्यायाधीश यांच्यावर पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात आली होती. सरकारने या आरोपांचे खंडन केले असून या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे.