प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवणे वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. पण तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्यही नाही. या गोष्टीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जोधपूरमधील कंसार गावातील मंगनाराम बिश्नोई यांच्या दोन्ही मुलांनी हे अभूतपूर्व यश मिळवले आहे. मंगनाराम ट्रक चालवायचे काम करत असून आपल्या मुलांनी मिळवलेले यश त्यांच्यासाठी नक्कीच खास आहे. महेंद्रकुमार बिश्नोई आणि श्यामसुंदर बिश्नोई हे यावर्षी अनुक्रमे NEET आणि JEE Advance मध्ये पास झाले आहेत. या दोघांनी मागच्या वर्षभरात केलेल्या तयारीचे फळ त्यांना आता मिळाले आहे.

मागच्या एक वर्षापासून ही मुले आपल्या पालकांना भेटली नसून आर्थिक परिस्थितीमुळे ते घरीही जाऊ शकले नाहीत. त्यांचे वडिल मंगनाराम यांनाही त्यांच्या ट्रक चालविण्याच्या कामामुळे बऱ्याचदा बाहेरच रहावे लागते. मुलांचे शिक्षण आणि त्यांचा इतर खर्च यासाठी वडिलांनी बरेच कर्ज घेतले असून ते फेडण्यातच त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा जातो. मात्र आता आपली मुले चांगल्या संस्थेतून डॉक्टर आणि इंजिनिअर होणार असल्याने आपल्याला आनंद झाला असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

या दोन्हीही मुलांना कॉलेजला प्रवेश घेण्याआधी आपल्या वडिलांना भेटायची इच्छा आहे. त्याचबरोबर कर्जाची रक्कम भरुन वडिलांवरील भार कमी करायचा असल्याचेही दोघांनी सांगितले. मंगनाराम म्हणतात, दोन्ही मुलांच्या परीक्षा पास झाल्याचे कळाल्यावर माझी ट्रक चालवून आलेला थकवा कुठच्या कुठे पळाला होता. महेंद्र याला NEET परीक्षेत ५१४० वी रॅंक मिळाली असून श्यामसुंदर याला JEE Advance मध्ये १५,९४९ रँक मिळाली आहे.