कॉम्प्युटरसाठी लागणारे प्रोसेसर आणि चीप निर्मितीतील जगातील बलाढ्य कंपनी ‘इंटेल’ने पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत आपल्या १२ हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचे निश्चित केले असून, येत्या ६० दिवसांत संबंधित कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती देण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीच्या मनुष्यबळाची फेररचना करण्यात येत असून, त्या अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कॉम्प्युटरच्या बाजारातील अनिश्चिततेच्या वातावरणाचा कंपनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीकडे १०७३०० कर्मचारी होते. त्यापैकी सुमारे ११ टक्के कर्मचारी फेररचनेत अतिरिक्त ठरत असून, त्यांनाच सेवेतून काढण्यात येणार आहे. पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. कॉम्प्युटरच्या क्षेत्रात प्रोसेसर निर्मितीमध्ये इंटेल अग्रगण्य मानले जाणारे नाव आहे. पण मोबाईल प्रोसेसर निर्मितीमध्ये कंपनी लक्षवेधक कामगिरी करू शकली नाही. सध्यातरी कंपनीचा ६० टक्के महसूल हा प्रोसेसर आणि चीप निर्मितीतूनच येतो आहे. कर्मचारी कपातीमुळे कंपनीला चालू वर्षात ७५ कोटी डॉलरची तर पुढील वर्षात १.४ अब्ज डॉलरची बचत करता येणे शक्य होणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.