केंद्रातील सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी निगडीत असणाऱ्या केंद्रसरकारच्या खात्यांमध्ये महत्वपूर्ण बदल होण्याचे संकेत आता मिळत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असणारे काही महत्वाचे सुरक्षा विभाग आता थेट पंतप्रधानांच्या कक्षेत आणण्याची तयारी आता दिल्लीत वेग पकडत आहे. अंतर्गत सुरक्षेशी संबंधित काही महत्वपूर्ण खात्यांच्या कारभारची सूत्रे गृह मंत्रालयाकडून काढून घेत थेट पंतप्रधानांकडे देऊन नव्या सरकारला बळकटी देण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचे केंद्रीकरण केले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयातील सुत्रांच्या माहितीनुसार इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनआयए) या दोन्ही संस्थांची मुख्यालये दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये हलविण्याची तयारी सुरू झाली आहे. उर्वरित सुरक्षा संस्थांचा कारभार सध्यातरी गृहमंत्रालयाच्या अखत्यारित राहणार असल्याचेसुद्धा सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून या घडामोडींसंबंधी कोणतीही वाच्यता करण्याचे टाळले जात आहे. या निर्णयामुळे निमलष्करी दल आणि देशातीत विविध राज्यसरकारांच्या सुरक्षा व्यवस्थांसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हक्कांवर टाच येणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी भाजप नेते राजनाथ सिंह यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कारभार देण्यात येणार होता. मात्र, या विकेंद्रीकरणामुळे या खात्याचे महत्व कमी होणार असल्याने गृह मंत्रालयाचे माजी सचिव आर.के. सिंग यांना राज्यमंत्रीपद देऊन ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा कारभार येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.