अमेरिकेसह इतर काही देशात वर्णविद्वेषाविरोधातील सध्याच्या निषेध लढय़ास ‘दी इंडीजिनस कलेक्टिव्ह इंटरनॅशनल’ या वांशिक व इतर मुद्दय़ांवर द्वेषमूलकतेच्या विरोधात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनेने पाठिंबा दिला आहे.

निषेधाच्या निवेदनावर भारतातील नामवंत भाषातज्ज्ञ व विचारवंत डॉ. गणेश देवी यांचीही स्वाक्षरी आहे. देवी हे गेली काही वर्षे या संस्थेशी निगडित आहेत. सध्या अमेरिकेत आफ्रिकी-अमेरिकी नागरिक जॉर्ज फ्लॉइड याच्या पोलीस अत्याचारातील मृत्यूनंतर देशभर आंदोलनाचा भडका उडला आहे. त्या पार्श्वभूमीवर या निवेदनाला महत्त्व आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आमची संघटना मूलनिवासी (अधिवासी) लोकांसाठी काम करते. त्यांचे सांस्कृतिक व इतर हक्क डावलले जाऊ नयेत व त्यांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी आमचे प्रयत्न नेहमीच सुरू आहेत. सध्या अनेक देशात वर्णविद्वेषाविरोधात काही व्यक्ती, गट, संघटना निषेध करीत आहेत.  त्यासाठी निषेधाच्या माध्यमातून लढा देत आहेत त्याला आम्ही पाठिंबा देत आहोत. काही देशातील राजवटी, राजकीय पक्ष, काही देशहीन गट आमच्या बांधवांना धमक्या देत असून त्यांच्या विरोधात द्वेष पसरवत आहेत. वंश, जात, लिंग, धर्म, भाषा यांच्या आधारे केला जाणारा कुठलाही भेदभाव आम्हाला मान्य नाही. मूलनिवासी, कृष्णवर्णीय लोकांना दहशत निर्माण करून घाबरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मूलनिवासी लोकांचा कुठल्याही  प्रकारच्या सामाजिक भेदभावास विरोध आहे. मूलनिवासी लोकांच्या मते सर्व माणसे ही पृथ्वीमातेची लेकरे आहेत. सर्व गोष्टीत समान अधिकार व जबाबदाऱ्या आहेत.  सध्या इतिहास एका महत्त्वाच्या कालखंडातून जात असून फुटीरतावादी शक्तींना रोखण्यासाठी, त्यांना अणुयुद्धांसारख्या विनाशी प्रकारांपासून रोखण्यासाठी तसेच जगात सामाजिक सलोखा निर्माण करून गुलामगिरीचे उच्चाटन करण्यासाठी जगातील नेते, शांतताप्रेमी विचारवंत, कार्यकर्ते, संघटना यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सर्वजण समान व मुक्त आहेत.

डॉ. गणेश देवी यांच्यासह मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या

या निवेदनावर ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅनी ब्रूस्टर, ली जोआकिम, पेनी अ‍ॅलन, ट्रेसी बेन्सन, कॅनडाच्या प्रिसिला सिटी, रॉबटरे विवरेक सॅलिनस, कोलंबियाचे ऑस्कर ग्वाड्रियोला, जर्मनीचे काटजा सार्कोवस्की, भारताचे डॅक्सीन छारा, गणेश देवी, कल्पना कनाबिरन, मॉली कौशल, न्यूझीलंडचे चार्लस डॉसन, ख्रिस प्रेंटिस, हुआना स्मिथ, प्युलेल पेनेह्य़ुरो, तमासैलू सुआली, नेदरलँड्सचे आओन व्हॅन एंजलेनहोवन, फिलिपिन्सचे लिली रोझ, ब्रिटनचे ब्रेन्डन निकोलस, जेम्स एल. कॉक्स, अबुधाबीचे झिमेना कोडरेवा, अमेरिकेच्या रिबेका रुट, सीथ गारफिल्ड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.