गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्य़ात थंगाध येथे गोळीबारात तीन दलित युवक चार वर्षांपूर्वी मारले गेले होते त्या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक नेमण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी चौकशी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या घटनेबाबत दलित नेत्यांनी चौकशीची वारंवार मागणी केली होती. कॅबिनेट मंत्री आत्माराम परमार, माजी मंत्री रमणलाल व्होरा, राज्यसभा सदस्य शंभुप्रसाद तुंडिया यांच्यासह अनेक दलित नेत्यांनी गोळीबाराच्या चौकशीची मागणी केली होती. सरकारने या प्रकरणी सुनावणीस गती देण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याचेही जाहीर केले आहे. सरकारने या दलितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये भरपाई जाहीर केली आहे. थंगाध पोलीस गोळीबाराचा मुद्दा उना येथे गोहत्या बंदीच्या नावाखाली काही दलितांना मारहाण करण्यात आल्याने पुन्हा ऐरणीवर आला आहे. उना दलित अत्याचार विरोधी समितीने अहमदाबाद ते उना असा मोर्चा काढला होता, त्यात थंगाध येथील गोळीबाराच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. थंगाध गोळीबारातील मृतांच्या कुटुंबीयांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीसाठी उपोषण केले होते. राजकोट शहर पोलीस आयुक्त अनुपम सिंग गेहलोत, सुरत शहर पोलीस उपायुक्त परिक्षिता राठोड, पोरबंदरचे पोलीस अधीक्षक तरूण कुमार दुग्गल हे विशेष चौकशी पथकाचे सदस्य आहेत. २२-२३ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री पोलिसांनी दलित-ओबीसी यांच्यातील चकमकीच्या वेळी गोळीबार केला होता त्यात तीन दलित ठार झाले होते. त्यात पंकज सुमरा, प्रकाश परमार, मेहुल राठोड यांचा समावेश होता. सरकारने याआधीही या घटनेच्या चौकशीसाठी सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याचे मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती, पण त्या समितीचा अहवाल जाहीरच करण्यात आला नाही.