केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घर खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार एखादा बिल्डर दिवाळखोरीत निघाला तर त्याच्या संपत्तीत ग्राहकांनाही वाटा मिळणार आहे. बुकिंग केल्यानंतरही घराचा ताबा मिळालेला नाही अशा ग्राहकांना हा वाटा मिळणार आहे. आता त्याला किती वाटा द्यायचा हे त्या बिल्डरने किती कर्ज घेतलं आहे या रकमेवर अवलंबून असणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात यासंबंधी अध्यादेश काढण्यात आला आहे.

एखादा बिल्डर दिवाळखोरीत निघाला तर त्याने ज्या बँकेंकेडून कर्ज घेतलं आहे, त्या बँकेचा संपत्तीवर सर्वात पहिला हक्क असतो अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र आता या कायद्यात बदल करण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार संबंधित बिल्डरच्या संपत्तीत घर खरेदीदारांचाही वाटा असणार आहे.

घरासाठी पैसे भरुनही ताबा मिळालेला नसलेल्या ग्राहकांना वाऱ्यावर सोडलं जाऊ शकत नाही असं दिवाळखोरी कायदा सुधारणा समितीनं स्पष्ट केलं आहे. घर खरेदी करूनही त्याचा ताबा न मिळालेल्या ग्राहकांना बिल्डरच्या संपत्तीतील वाटा मिळावा, अशी शिफारस समितीकडून करण्यात आली होती. ही शिफारस मान्य करण्यात आली असून त्यानुसार बदल करण्यात आला आहे.