पंजाबच्या भटिंडामध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात हातात पोस्टर घेऊन सहभागी झालेल्या एका जवानाचा फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत एका माजी सैन्य अधिकाऱ्याने याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. गुप्तचर यंत्रणांनीही फोटोतील जवान हा सेवेत आहे की नाही याची खात्री करुन घेत आहे.

निवृत्त लेफ्ट. जन. एच. एस. पनाग यांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट करुन म्हटलं की, “याप्रकरणाची चौकशी तसेच संबंधित जवानावर शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी. कारण लष्करी सेवेत असलेल्या जवानांना अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेता येत नाही. याबाबत लष्कराची स्पष्ट नियमावली असून या नियमांबाबत तडजोड केली जाऊ नये.”

शेतकरी आंदोलनात दिसून आलेल्या लष्करी गणवेशातील या जवानाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला असून काही वर्तमानपत्रांमध्येही तो छापून आला आहे. डोक्यावर पगडी, अंगात लष्करी गणवेश त्यावर स्वतःच्या नावाची पट्टी अशा वेशातील हा शीख जवान आहे. तसेच त्याने दोन्ही हातात एक पोस्टर घेऊन ते उंचावलं असून त्यावर “माझे वडिल शेतकरी आहेत. जर ते दहशतवादी असतील तर मी सुद्धा दहशतवादी आहे” असा मजकूर लिहिला आहे. सोमवारी भटिंडा येथील पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करताना या जवानाचा फोटो कॅमेरॅत कैद झाला आहे.

…तर शेतकऱ्यांसोबतची पुढची चर्चाही निष्फळ होईल; सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं

जवानांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून यामध्ये दोन जवान बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने शेतकरी आंदोलनावर केलेल्या टिपण्णीवर भाष्य करत आहेत. यावेळी त्यांच्या हातात AK-47 सदृश्य रायफलही आहे.

दरम्यान, सैन्य दलांच्या नियमावलीत सेवेत असलेल्या जवानांना निषेध आंदोलनांमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध आहे. मात्र, माजी सैनिकांसाठी असा कुठलाही प्रतिबंधात्मक नियम नाही. या पार्श्वभूमीवर अनेक माजी सैनिकांनी पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश इथले शेतकरी गेल्या तीन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. केंद्र सरकारने नवे कृषी कायदे रद्द करावेत यासाठी ते आंदोलन करत आहेत.