इशरत जहॉं कथित चकमकप्रकरणी आयपीएस अधिकारी पी. पी. पांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने बुधवारीच पांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
इशरत जहॉं आणि तिच्या साथीदारांची २००४ मध्ये चकमकीत हत्या करण्यात आली, त्यावेळी पांडे हे अहमदाबादच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त होते. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतच इशरत जहॉं आणि तिच्या साथीदारांना अहमदाबादच्या सीमेवर मारण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये पांडे यांच्यासह एकूण सात पोलिस अधिकाऱयांची नावे आहेत. गेल्या महिन्यात दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रामध्ये ही चकमक बनावट असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.