तुर्कस्तानात नववर्षदिनी नाइट क्लबवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने घेतली आहे. या हल्ल्यात ३९ जण ठार झाले. त्यात दोन भारतीयांचा समावेश आहे. सोशल मीडियावर आयसिसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खिलाफतच्या सैनिकांनी रैना नाइट क्लब येथे हल्ला घडवून आणला. मध्य आशियातील आयसिस शाखेने ही जबाबदारी घेतल्याचे सूचित होत आहे.
दैनिक हुर्रियतने म्हटले आहे, की तुर्की पोलीस व गुप्तचरांना जी माहिती मिळाली आहे, त्यानुसार काही शहरांमध्ये असे हल्ले होणार असल्याची कल्पना होती. डिसेंबरमध्ये पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून काही जणांना अटक केली होती, त्यात काही माहिती हाती आली.
यातील हल्लेखोर अजून बेपत्ता असून तो आयसिसशी संबंधित आहे व तो किरगिझस्तान किंवा उझबेकिस्तानचा असावा. जूनमध्ये इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावर हल्ले करणाऱ्या गटातीलच एकाने हा हल्ला केला असावा असे सांगण्यात येते. त्या हल्ल्यात ४७ जण मरण पावले होते. हुíरयतचा स्तंभलेखक अब्दुलकादीर सेल्वी याने लिहिले आहे, की ३० डिसेंबरला तुर्कस्तानला अमेरिकेकडूनही गुप्तचर माहिती मिळाली होती, त्यात इस्तंबूल व अंकारा येथे नववर्षदिनी हल्ल्याची शक्यता वर्तवली होती.
हल्ला नेमका कुठल्या ठिकाणी होणार याची गुप्तचर माहिती मात्र नव्हती. नववर्षदिनी इस्तंबूलमधील रैना नाइट क्लब येथे हल्ला झाला, त्यात ३९ जण ठार झाले. हल्लेखोर कपडे बदलून पसार झाला असावा. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०१६ मध्ये इस्तंबूल, अंकारा व इतर काही शहरांत हल्ले झाले होते.