देशभर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत महाशिवरात्री साजरी

पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबा व जैश ए महंमद या संघटनेचे दहा संशयित दहशतवादी गुजरात व इतरत्र हल्ले करण्याच्या उद्देशाने घुसले असल्याची माहिती गुप्तचरांना मिळाल्यानंतर महाशिवरात्रीला देशातील महत्त्वाच्या शिवमंदिरांसह काही महानगरांत सुरक्षा कडक करण्यात आली होती. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देशातील सुरक्षाव्यवस्थेचा या निमित्ताने आढावा घेतला. गुजरात मार्गे काही दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचरांना मिळाली होती. राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत गृहसचिव राजीव मेहर्षी, गुप्तचर संचालक दिनेश्वर शर्मा उपस्थित होते. सिंह यांनी दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यतेमुळे करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला.

महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांमध्ये गर्दी असल्याने दिल्लीत कडक सुरक्षा ठेवण्यात आली. दिल्ली पोलिसांची बैठक झाली, त्यात उपआयुक्तांना त्यांच्या क्षेत्रात सुरक्षा कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुजरातमध्ये अभूतपूर्व सुरक्षा

गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर राज्यभर अभूतपूर्व कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. राज्यात एनएसजी पथके तैनात करण्यात आली आहेत.  पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून, सर्व महत्त्वाची मंदिरे आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी सोमवारी उच्चस्तरीय सुरक्षा बैठक आयोजित करून स्थितीचा आढावा घेतला.