इसिसने उत्तर बगदादमध्ये रमझानच्या पूर्वसंध्येला काल केलेल्या मोटारबॉम्ब हल्ल्यात ११५ ठार झाले असून १७ जण बेपत्ता झाले आहेत, असे सांगण्यात आले. काल हा हल्ला उत्तर बगदादमधील शिया शहरात करण्यात आला होता. जखमींची संख्या १२० असल्याचे सांगण्यात आले. मध्यवर्ती भागात झालेल्या या हल्ल्यामुळे संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
अब्बास हादी सलाह यांनी सांगितले की, ९० जण हुतात्मा झाले असून १२० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात पंधरा मुले मरण पावली असून रमझाननिमित्त खरेदीसाठी बाजारात गर्दी झालेली असताना हा मोटार बॉम्ब हल्ला करण्यात आला. दरवर्षी रमझानला बॉम्ब हल्ला होतोच. २००३ नंतर दियाला येथील हा सर्वात मोठा हल्ला आहे. खान बानी साद हे ठिकाण दियाला प्रांतात असून सरकारने ते जानेवारीतच इसिसमुक्त घोषित केले होते पण त्यानंतर हल्ले सुरू होते. त्यात इसिसने काल अचानक हादरा दिला. इसिसने म्हटले आहे की, आम्ही काल तीन टन स्फोटके वाहनावर ठेवून ती उडवली. जून २०१४ च्या राष्ट्रीय हल्ल्यांनंतर इतकी प्राणहानी कधीच झाली नव्हती.