युद्धाच्या झळा आता आयसिसलाही बसू लागल्या असून या संघटनेने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या दहशतवाद्यांच्या वेतनात कपात केली आहे, असे आयसिसच्या काही कागदपत्रांवरून समजले आहे. आयसिस ही संघटना इराक व सीरियातून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालते व जिहादी दहशतवाद्यांना दर पंधरा दिवसाला वेतन दिले जाते. त्यांना महिन्याला ४०० ते १२०० डॉलर्स दिले जातात, त्यांच्या पत्नीसाठी ५० डॉलर्स तर मुलांसाठी २५ डॉलर्स दिले जातात.
अयमेन जवाद अल तामिमी या आयसिस विषयक तज्ज्ञाला ही कागदपत्रे मिळाली असून ते मध्यपूर्वेतील एका संस्थेत काम करतात. सीरियातील अल रक्का शहरातून ही कागदपत्रे मिळाली असून ते शहर आयसिसची राजधानी आहे. आयसिसने दहशतवाद्यांचे वेतन कमी केले आहे हे कागदपत्रावरून दिसत आहे. लोकांवर कर लादून आयसिस पैसा गोळा करत असून तेलाच्या विहिरी हे त्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. २०१५ मध्ये त्यांनी तेलावर दर महिन्याला ४० दशलक्ष डॉलर्स मिळवल्याचे समजते. अमेरिकेने इराकमधील मोसूल येथे २००० पौंड वजनाचे बाँब टाकले असून त्यात आयसिसला आर्थिक फटका बसला आहे. आयसिस त्यांच्या अभियंत्यांना १५०० डॉलर्स महिना देते, लोकांना सवलतीच्या दरात ब्रेड दिले जातात. अमेरिकेने अलिकडे जे बॉम्बहल्ले केले आहेत त्यामुळे आयसिसची आर्थिक घडी मोडण्याच्या बेतात आहे. त्यामुळे त्यांनी दहशतवाद्यांच्या वेतनात कपात केली आहे, ही कपात ५० टक्के आहे, असे आयसिसने एका निवेदनात म्हटले आहे. असे असले तरी महिन्यातून दोनदा वेतन दिले जाणार आहे.