इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडून हस्तगत करण्यात आलेल्या गुप्त कागदपत्रांतून त्यांच्या जगभरातील २२,००० सदस्यांची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे या संघटनेविरुद्धच्या लढय़ाला बळ मिळाले आहे.

सीरिया आणि इराकमध्ये कार्यरत असलेल्या माजी आयसिस सदस्याकडून जर्मन गुप्तहेर खात्याला ही माहिती मिळाली आहे.

अबू हमिद असे त्या आयसिस सदस्याचे नाव असून त्याला संघटनेच्या कार्यपद्धतीबाबत भ्रमनिरास झाल्याने त्याने ती सोडली. तेथून परागंदा होताना त्याने आपल्यासोबत संघटनेची बरीच माहिती मेमरी स्टिकमधून आणि अन्य कागदपत्रांच्या रूपात पळवून आणली. ती तुर्कस्तानमधील एका पत्रकाराला दिली. तेथून पुढे ती जर्मन गुप्तहेरांनी हस्तगत केली. यासंबंधीचे वृत्त ‘स्काय न्यूज’ने प्रसिद्ध केले आहे.

या कागदपत्रांतून आयसिसबाबत बरीच गुप्त माहिती जाहीर झाली आहे. त्यात त्यांच्या जगभरातील २२,००० सदस्यांची ओळख उघड झाली आहे. तसेच संघटनेत भरतीसाठी वापरल्या जाणाऱ्या २३ प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नावलीही समोर आली आहे. त्यात दहशतवादाचा पूर्वानुभव काय, असाही एक प्रश्न आहे.