आयसिसला पाठिंबा देणाऱ्यांनी आता प्रादेशिक भाषेत संदेश पाठवण्यास सुरूवात केली आहे. त्यात हिंदी व तमिळ भाषेतील संदेशांचा समावेश आहे, असे राज्यसभेत सांगण्यात आले. गृह राज्यमंत्री हरिभाई पराथीभाई चौधरी यांनी सांगितले, की गुप्तचर माहितीनुसार आयसिस समर्थक घटकांनी सामाजिक माध्यमांवर हिंदी, उर्दू, तमिळ, गुजराती व इंग्रजी भाषेतून संदेश पाठवण्यास सुरूवात केली आहे. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आयसिस कुणाला भरती करीत आहे यावर लक्ष ठेवले जात आहे. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये ३९ संघटना बेकायदा ठरवण्यात आल्या असून त्यात आयसिसचा समावेश आहे.