पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दक्षिण आशियाई उपग्रहाच्या (जीसॅट-९) यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांचे कौतूक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या प्रमुखांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा सोहळा पाहिला. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, दक्षिण आशियाई उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक आहे. त्यामुळे दक्षिण आशियाई देशांतील सहकार्याची नवी क्षितिजे खुली होतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी सर्व राष्ट्रांच्या प्रमुखांनी केलेले सहकार्य़ आणि त्यांच्या उपस्थितीमुळे आजचा क्षण भारतातील लोकांच्या मनाला सुखावणारा ठरेल. आपण दक्षिण आशियाई देश एक कुटुंब आहोत. या परिसरात शांती, विकास आणि भरभराटीसाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करू. आम्ही दोन वर्षांपूर्वी दिलेल्या वचनाची पूर्ती केली आहे. दक्षिण आशियाई देशांतील सहकार्याच्यादृष्टीने हे मोठे पाऊल आहे. यामुळे या देशांतील दीड अब्ज लोकांना फायदा होणार आहे. या उपग्रहामुळे प्रभावी दूरसंचार व्यवस्था, बँकिंग व्यवस्था, हवामानाचा अंदाज, वैद्यकीय सुविधांसाठी टेलिमेडिसीनच्या सुविधा उपलब्ध होतील. ‘सबका साथ सबका विकास’ हे आमचे लक्ष्य आहे.  जीसॅट-९ या उपग्रहामुळे आशियाई परिसरात विकास आणि शांती निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे या परिसरातील गरीबी संपून संपन्नता वाढेल, असे मोदी यांनी म्हटले.

जीसॅट-९ च्या निर्मितीसाठी २३५ कोटींचा खर्च आला आहे. या उपग्रहाचा उद्देश हा दक्षिण अशियायी भागात देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत आणि परस्परांत संपर्क उपलब्ध व्हावा असा आहे. या उपग्रहामुळे सहभागी देशांना डीटीएच, काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्ध करून देईल. याशिवाय देशांना संकटकाळी एकमेकांना माहिती पाठवण्यास मदत करील, असे इस्त्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दक्षिण आशियातील सात देश जीसॅट-९ उपक्रमाचा भाग आहेत. यामध्ये भारतासह श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि मालदीवचा समावेश आहे. पाकिस्तानचा या उपक्रमात सहभाग नाही. आपल्याकडे स्वतंत्र अंतराळ कार्यक्रम असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. या उपग्रहामुळे संदेशवहन सेवेचे जाळे अधिक घट्ट होणार आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन कार्यातदेखील जीसॅट-९ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. दक्षिण आशियातील देशांमधील संपर्क व्यवस्था एका वेगळ्या उंचीवर नेण्यात जीसॅट-९ मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास ‘इस्रो’कडून व्यक्त करण्यात आला आहे. जीसॅट-९ च्या मोहिमेचा कालावधी १२ वर्षांचा असेल.