अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांच्याशी पुढील आठवडय़ात होणाऱ्या चर्चेत उपस्थित करणार आहेत. असे असले तरी भारतातील लोकशाही परंपरा व संस्था याबाबत आम्हाला आदर आहे असे ‘व्हाइट हाऊस’ने म्हटले आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याबाबतचे मुद्दे या अनुषंगाने ट्रम्प उपस्थित करतील असे सूतोवाच  यावेळी करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॉन्फरन्स हॉलमधील  कार्यक्रमात सांगितले की, अध्यक्ष ट्रम्प हे दोन्ही देशांची लोकशाही परंपरा व धार्मिक स्वातंत्र्य या मुद्दय़ांवर मते मांडतील. धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा महत्त्वाचा असून तो ठोसपणे मांडला जाईल.

एनआरसी व सीएए हे मुद्दे ट्रम्प उपस्थित करणार का, या मुद्दय़ावर अमेरिकी अधिकाऱ्यांनी उपरोक्त स्पष्टीक रण दिले.

‘व्हाइट हाऊस’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही देशांची वैश्विक मूल्यांबाबत वचनबद्धता मोठी असून भारतीय लोकशाही परंपरा व संस्था याबाबत आम्हाला आदर आहे. या परंपरा यापुढेही पाळण्यासाठी भारताला प्रोत्साहित करण्याचा विचार आहे. सीएए व एनआरसी या मुद्दय़ांवर आम्हालाही चिंता वाटते आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चेत अध्यक्ष ट्रम्प हे मुद्दे उपस्थित करणार आहेत. भारताने लोकशाही परंपरा व धार्मिक अल्पसंख्याकांचा सन्मान या गोष्टींचे पालन करावे, असे अमेरिकेचे मत आहे, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भारताची धार्मिक परंपरा मोठी आहे कारण चार धर्माचे जन्मस्थान भारत हेच आहे. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी निवडणुकीतील विजयानंतर धार्मिक अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशकता दाखवण्याचे वचन दिले होते. धार्मिक स्वातंत्र्याबाबत जग भारताकडे आशेने पाहात आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

जयपूरमध्ये अमेरिकी लष्कराकडून पाहणी

जयपूर : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खास विमान खराब हवामानामुळे अहमदाबादला उतरू शकले नाही तर ते जयपूर विमानतळावर उतरवले जाणार आहे. त्यासाठी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेची अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी तपासणी केली. ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर २४ फेब्रुवारीला येत आहेत.