भ्रष्टाचार जो कोणीही करेल त्याला तुरुंगात टाकणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. भ्रष्टाचार करणारी व्यक्ती कोणीही असो, त्या व्यक्तीला सोडणार नाही.  देशात सध्याच्या घडीला भ्रष्टाचार करणारे तीन माजी मुख्यमंत्री तुरुंगात आहेत. यापुढे एकाही भ्रष्टाचारी माणसाला माफ करणार नाही अशी गर्जनाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. दिल्लीत झालेल्या एनसीसीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

भ्रष्टाचार आणि काळा पैसा या विरोधात सुरु झालेली लढाई त्याचे उच्चाटन होईपर्यंत थांबणार नाही. या लढाईत तरुणाईने सहभाग घेतला पाहिजे असेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एक काळ असा होता की भ्रष्टाचाराची चर्चा होत असे आणि लोक म्हणत असत की यात तर मोठ्या लोकांची नावे आहेत त्यांना काहीही होणार नाही. पण सध्या तीन माजी मुख्यमंत्री भ्रष्टाचार केल्यामुळेच तुरुंगात आहेत असेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोणी किती ताकदीचा असो, त्याचे वर्तन जर भ्रष्ट असेल त्याने भ्रष्टाचार केला असेल तर त्या व्यक्तीला तुरुंगात धाडणारच असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

सध्याच्या घडीला भ्रष्टाचार केल्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र आणि हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला या तिघांचीही रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराविरोधात सुरु असलेली लढाई थांबणार नाही. भ्रष्टाचाराची कीड देश पोखरते आहे. त्यापासून देशाचे रक्षण करायचे असेल तर तरूणाईने पुढे यायलाच हवे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. तसेच व्यवहार डिजिटल व्यवहार करा असेही आवाहन केले जेणेकरून देणे-घेणे व्यवहारात पारदर्शकता येईल असेही मोदी यांनी म्हटले आहे.