14 November 2019

News Flash

नोटबंदी हा दहशतवादी हल्लाच! – राहुल गांधी

राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला

नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केलं आहे. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक लहानसहान उद्योग ठप्प झाले आहेत. या निर्णयामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असेही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या क्रूर हल्ल्यामागे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली.

केंद्र सरकारने देशातून भ्रष्टाचार नष्ट करण्यसाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी चलनात असलेल्या ५०० आणि १ हजारच्या नोटा बंद केल्या. त्यानंतर नव्या नोटा मिळवताना नागरिकांची मोठी दमछाक झाली होती. देशभरात अनेक नागरिकांचा बँकेच्या रांगेत मृत्यू झाला होता. या निर्णयावरुन विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात निदर्शनंही केली होती.

First Published on November 8, 2019 12:29 pm

Web Title: its 3 yrs since the demonetisation terror attack that devastated the indian economy says rahul gandhi scj 81