पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणालाही पैसे खाऊ देत नसल्याने अनेकांची नसबंदी झाली आहे. मोदी स्वत: देखील पैसे खात नाही आणि दुसऱ्यांनाही खाऊ देत नसल्याने यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणूनच पुन्हा सत्तेत येण्यासाठी यांची धडपड सुरू असल्याचे सांगत देवरीतील भाजपा आमदार संजय पुराम यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदियात सभा घेतली. या सभेत मोदींच्या आगमनापूर्वी देवरीतील भाजपा आमदार संजय पुराम यांनी सभेला संबोधित केले. पुराम यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि ऱाष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.  ‘काँग्रेसने ५० वर्षांमध्ये काहीच केले नाही आणि आमच्या प्रामाणिक नेत्याला ते आता चोर बोलत आहे. जनता जागरुक असून कोण चोर आणि कोण चोर नाही हे जनतेला ठाऊक आहे. तुम्ही जामिनावर बाहेर आहात आणि आमच्या प्रामाणिक नेत्याला चोर म्हणता’, असे सांगत त्यांनी गांधी कुटुंबावर टीका केली.

मध्य प्रदेशमध्ये कर्जमाफीवरुन काँग्रेसने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदी सरकारने प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले. आता काँग्रेसचे राहुल गांधी म्हणतात की आम्ही ७२ हजार रुपये जमा करु. पण हे पैसे काँग्रेसवाले कुठून आणणार? असा सवाल पुराम यांनी उपस्थित केला. या लोकांनी इतकी वर्ष देशाला फसवल्याचा आरोपही पुराम यांनी केला.

संजय पुराम यांनी अभिनंदन यांच्या सुटकेबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, “पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राइक केले. यादरम्यान, अभिनंदनने विमानातून उडी मारली आणि तो चुकून पाकिस्तानच्या हद्दीत पडला. यानंतर इम्रान खानने मोदींना फोन केला आणि सांगितले की तुमचा जवान आमच्या ताब्यात आहे. यावर मोदींनी त्यांना सांगितले की, उद्या सकाळी माझा नाश्ता पूर्ण होईपर्यंत माझा जवान भारतात परतला पाहिजे. अन्यथा परिणाम भोगावे लागतील. देशाला अशाच धाडसी पंतप्रधानाची गरज आहे. देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि देशाला नरेंद्र मोदी यांच्या रुपाने असे नेतृत्व मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.