देशात करोना संसर्ग दिवसेंदिवस अतिशय़ झपाट्याने वाढत आहे. दररोज लाखांच्या संख्येत करोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय हजारांच्या संख्ये रूग्णांचे मृत्यू देखील होत आहेत. भारतावर करोनाच्या दुसऱ्या लाटेचं मोठं संकट ओढावल्याचं चित्र आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा निर्माण झाल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत आता अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र अद्यापही देशातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आज सरकारकडून नागरिकांना सूचक इशारा देण्यात आल्याचं दिसत आहे. ही वेळ घरात देखील मास्क वापरण्याची आहे, असं सांगण्यात आलं आहे.

नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी आज(सोमवार) म्हटले की, ”ही वेळ कुणालाही घरी आमंत्रण देण्याची नाही, तर घरातच राहण्याची आणि लोकांनी घरात देखील मास्क वापरण्याची आहे.” तसेच, या करोना काळात कृपया विनाकारण घराबाहेर पडू नका आणि मास्क वापरणं अतिशय आवश्यक आहे. तसेच, करोनाची प्राथमिक लक्षणं आढळल्यास घरातच विलगीकरणात रहावं, असं देखील सांगण्यात आलं आहे.

डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, करोनाची प्रारंभीची लक्षणं दिसल्यास स्वतःचे तत्काळ विलगीकरण करून घ्या. रिपोर्ट येईपर्यंत वाट पाहू नका. अशावेळी आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह येण्याची देखील शक्यता आहे. मात्र तरी देखील लक्षणं पाहता स्वतःला संसर्ग झाला असल्याचे समजा आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करा.

याशिवाय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले की, जर दोन व्यक्ती मास्क वापरत नाही व सोशल डिस्टंसिंगचं पालन करत नसतील तर यामुळे करोना संसर्गाचा धोका ९० टक्के वाढू शकतो. जर मास्कचा वापर केला आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करत असतील तर धोका ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. जर सूचनांचे पालन केले गेल तर एक बाधित रूग्ण ३० दिवसांमध्ये ४०६ लोकांना बाधित करण्याची शक्यता आहे.