जैन मुनी विश्रांत सागर यांच्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. देशभरात महिलांविरोधात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये ९५ टक्के वेळा चूक मुलींचीच असते असं वक्तव्य विश्रांत सागर यांनी केलं आहे. इतकंच नाही तर विश्रांत सागर यांनी मुलींचा उल्लेख वस्तू असा करत त्यांनी संयमाने वागण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. पत्रकार परिषदेत महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाढत्या अत्याचाराच्या घटनांसाठी महिलाच जबाबदार असल्याचं सांगत वाद निर्माण केला आहे.

जैन मुनी विश्रांत सागर बोलले आहेत की, ‘आजच्या काळात मुलींनी अत्यंत सावधपणे वागण्याची गरज आहे’. यामागचं कारण सांगताना त्यांनी सांगितलं की, ‘कारण मुलींना आपलं माहेर आणि सासर दोन्हीकडचा मान राखायचा असतो’. पुढे ते बोलले आहेत की, ‘तरुणींनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली जाऊ नये. त्यांनी संस्काराचं शिक्षण घेतलं पाहिजे’.

दरम्यान जैन मुनी यांच्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात असून संताप व्यक्त केला जात आहे. या वक्तव्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता.