22 November 2019

News Flash

जम्मू-काश्मीरमध्ये ६ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

बांदिपोऱ्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद

प्रतिकात्मक छायाचित्र

जम्मू- काश्मीरमधील बांदिपोरा येथे शनिवारी सुरक्षा दलांनी ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या चकमकीत सुरक्षा दलातील एक जवान शहीद झाला असून दोन जवान यात जखमी झाले आहेत.

बांदिपोरा येथील हाजिन परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार शनिवारी राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप, केंद्रीय राखीव पोलीस दल, हवाई दलाच्या गरुड कमांडो पथकातील जवान आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या पथकाने परिसरात संयुक्त शोधमोहीम सुरु केली. सुरक्षा दलांनी चारही बाजूंनी घेरल्याचे लक्षात येताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरु केला.
सुरक्षा दलांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले असून यात सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत गरुड कमांडो दलातील एक जवान शहीद झाला. परिसरात अजूनही चकमक सुरु असून चकमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी बांदिपोऱ्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.

जम्मू- काश्मीरमध्ये २००१ मध्ये हवाई दलाच्या तळांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. यानंतर तळांच्या सुरक्षेसाठी हवाई दलाने गरुड कमांडो पथकाची स्थापना केली. गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत हवाई दलाचे गरुड कमांडो पथकही सहभागी होत आहे. यापूर्वी गेल्या महिन्यात बांदिपोरा येथेच दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गरुड कमांडो पथकातील दोन जवान शहीद झाले होते.

First Published on November 18, 2017 7:03 pm

Web Title: jammu and kashmir bandipora 6 terrorists killed one iaf garud commando martyred in encounter in hajin operation underway
टॅग Terrorists
Just Now!
X