जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि ‘जैश- ए- मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर अबू खालिदला कंठस्नान घालण्यात आले आहे. खालिद हा मूळचा पाकिस्तानचा असून जम्मू-काश्मीरमध्ये संघटनेचा तो ऑपरेशनल कमांडर होता.

बारामुल्ला येथे सैन्याच्या तुकडीने ‘जैश- ए-मोहम्मद’चा दहशतवादी खलिदला घेरले होते. चकमकीत जखमी झालेला खलिद घटनास्थळाजवळील एका इमारतीमध्ये लपून बसला होता. सैन्याच्या पथकाने या इमारतीला घेरले. कारवाईत खलिदचा मृत्यू झाल्याची माहिती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. खलिद हा जैश-ए- मोहम्मदचा उत्तर काश्मीरमधील ऑपरेशनल कमांडर होता. खलिद हा मूळचा पाकिस्तानचा असून त्याने पाकिस्तानमध्येच दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते. यानंतर त्याने भारतात घुसखोरी केली होती.

खलिद ऑक्टोबर २०१६ पासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. बारामुल्ला येथे ‘जैश’चे मॉड्युल सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त केले होते. यात खलिदचे नावही समोर आले होते. गेल्या आठवड्यात श्रीनगरजवळ सीमा सुरक्षा दलाच्या तळावर ‘जैश’च्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात तीन जवान जखमी झाले होते. तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. खलिद या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता, असे समजते. मॉस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचा समावेश होता. जैश ए मोहम्मदचा काश्मीरमधील म्होरक्या खलिद उर्फ खलिद भाईला कंठस्नान घातल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी दिली.

दरम्यान, २६ सप्टेंबररोजी ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वाँटेड कमांडर अब्दुल कयूम नजरला चकमकीत कंठस्नान घालण्यात आले होते. अब्दुल कयूमवर १० लाख रुपयांचे बक्षीसही होते. यात लागोपाठ दोन कमांडर्सना कंठस्नान घातल्याने दहशतवादी संघटनांना मोठा प्रमाणात हादरा बसला आहे.