जम्मू- काश्मीरमध्ये सध्या २१० दहशतवादी सक्रीय असल्याची माहिती समोर येत असून सर्वाधिक दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये सक्रीय आहेत. दहशतवाद्यांची ही संख्या कमी नसली तरी राज्यातील सुरक्षा दलाचे जवान या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पुरेसे आहेत, असे सैन्यातील सूत्रांचे म्हणणे आहे.

जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी कारवाया वाढल्या असून राज्यात सध्या २१० दहशतवादी सक्रीय असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी जम्मू- काश्मीरमध्ये हा आकडा २५० पर्यंत देखील गेला आहे. पण सध्याची परिस्थितीही गंभीर असून याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे सैन्यातील अधिकारी सांगतात. २१० पैकी ६५ टक्के दहशतवादी हे स्थानिकच आहेत. तर ३५ टक्के दहशतवादी हे पाकिस्तानमधून आले आहेत, अशी माहिती सैन्यातील सूत्रांनी दिली. यात सर्वाधिक दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीनचे असून हिज्बुलच्या दहशतवाद्यांचे प्रमाण ६२ ते ६४ टक्क्यांदरम्यान आहे. यानंतर लष्कर- ए- तोयबा आणि जैश- ए- मोहम्मद या संघटनांचा नंबर लागतो. या दोन्ही संघटनांचे मिळून एकूण ३५ टक्के दहशतवादी सक्रीय आहेत. उर्वरित दहशतवादी हे अन्य संघटनांचे आहेत.

स्थानिक तरुणांचे दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी राज्यातील एकूण दहशतवाद्यांमध्ये ६० टक्के दहशतवादी हे स्थानिक तर ४० टक्के दहशतवादी पाकिस्तानी असायचे. गेल्या काही महिन्यांमध्ये सीमेवर घुसखोरी रोखण्यात यश येत असले तरी स्थानिक तरुणांचे दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे प्रमाण वाढले असून ही चिंतेची बाब आहे. सद्यस्थितीत जम्मू- काश्मीरमध्ये ६५ टक्के दहशतवादी हे स्थानिक तर ३५ टक्के दहशतवादी पाकिस्तानी आहेत. गेल्या काही काळात स्थानिक दहशतवाद्यांचे प्रमाण ५ टक्क्यांनी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.

५५ तरुण दहशतवादी संघटनेत
गेल्या वर्षी १२८ तरुण दहशतवादी संघटनेत सामील झाले होते. या वर्षी आत्तापर्यंत ५५ तरुण दहशतवादी संघटनेत सामील झाले आहेत. मृत दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत जास्त लोक जमले की दहशतवादाकडे वळणाऱ्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे आता दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत जास्त लोकं जमू नये, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.