जम्मू-काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याचे वृत्त असून यामध्ये २० नागरिक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी एका बस स्थानकात नागरिकांवर ग्रेनेड बॉम्ब फेकले. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. हल्ला करुन पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांकडून शोध घेतला जात आहे.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सोमवारी सोपोर येथील एका बस स्थानकात नागरिकांवर ग्रेनेड फेकला. सुरुवातीला या हल्ल्यात नऊ नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता हा आकडा वाढला असून यामध्ये २० नागरिक जखमी झाले असून यांपैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारांसाठी श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

दरम्यान, सीआरपीएफच्या १७९ बटालिअनची टीम घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी परिसराची नाकाबंदी केली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा रक्षकांनी जोरदार मोहिम हाती घेतली आहे. त्यानंतर दहशतवादी आता सामान्य नागरिकांनाही निशाणा बनवत आहेत. उद्या युरोपियन युनियनच्या संसदेचे प्रतिनिधीमंडळ जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार असताना हा हल्ला झाला आहे.