दक्षिण काश्मीरमधील दहशतवाद प्रभावित शोपिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाचे १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले. या बिनविरोध निवडीमुळे भाजपाला येथे बहुमत प्राप्त झाले आहे. राज्यातील प्रमुख पक्ष नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने संविधानातील कलम ३५ अ ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीमुळे इतर लोकही निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहिले आहेत.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील अनेक चकमकीचा साक्षीदार ठरलेल्या शोपिया जिल्ह्यात १७ सदस्यीय स्थानिक संस्था आहे. यातील भाजपाने १३ जागांवर उमेदवार उभे केले होते. चार जागांवर कोणीच अर्ज दाखल केला नव्हता. निवडणूक अधिकाऱ्यांनी बुधवारी १३ वॉर्डमध्ये बिनविरोध निवडणूक झाल्याचे जाहीर केले. तर इतर चार जागांसाठी कोणीच नामांकन भरले नव्हते.

प्रदेश भाजपाने हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे. जम्मू-काश्मीरचे भाजपा प्रमुख रवींद्र रैना म्हणाले, आमचे लक्ष्य सर्वांचा विकास आहे. सर्व लोकांना आम्ही न्याय देऊ. आम्हाला खूप आनंद झाला आहे. दरम्यान, राजकीय तज्ज्ञांच्या मते, भाजपाचा हा विजय विशेष नाही. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने भाजपाचा सहज विजय झाला आहे.

नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीवर निशाणा साधत, ते म्हणाले, स्थानिक निवडणुकीवर बहिष्कार टाकून दोन्ही पक्षांनी हसू करुन घेतले आहे. सर्व निवडून आलेले उमदेवार हे काश्मिरी पंडित नसून मुसलमान असल्याचेही ते म्हणाले.