जम्मू काश्मीरामधून दहशतवाद पूर्णपणे संपवण्यासाठी केंद्र सरकार कडक पावले उचलणार असून, त्यादृष्टीने योजना आखण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली. कायमस्वरुपी उपाययोजनेसाठी ठोस रणनीती आखण्याची गरज आहे. याला थोडा वेळ लागेल, पण यावर उपाययोजना केल्या जात आहेत. जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

सरकार येथील लोकांसोबत चर्चेसाठी तयार आहे. हा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकार आणि राजकीय पक्षांना विश्वासात घेतले जाणार आहे. हे मी पूर्ण चर्चा करून अत्यंत जबाबदारीपूर्वक सांगत आहे. सध्या सरकारच्या काही योजना आहेत. या योजनेनुसार कामाची दिशा ठरवून त्यावर कार्य करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात यावर विचार करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ लागेल पण त्यानंतर सर्व काही ठीक होईल.

आम्ही काश्मीरप्रश्नी चर्चेसाठी तयार आहोत. सर्व समस्यांवर फक्त चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढता येऊ शकतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मोदी सरकार काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरत असून एकेकाळी जम्मू काश्मीर देशाची ताकद होती. पण आता हे राज्य देशाची कमकुवत बाजू झाली आहे, अशी टीका काँग्रेस उपाध्याक्ष राहुल गांधी यांनी केली होती.