पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूसंपादन, कोळसा आणि खाण क्षेत्रासंबंधी काढलेले अध्यादेश म्हणजे देशातील आणि देशाबाहेरील आपल्या उद्योगपती पाठिराख्यांना दिलेली भेट आहे, अशा शब्दांत संभावना करीत जनता दल (युनायटेड)चे अध्यक्ष शरद यादव यांनी जनता परिवारातील पक्ष याविरुद्ध आंदोलन करतील, असा इशारा बुधवारी दिला.  
आंदोलनाची धोरणे ठरवण्यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव गुरुवारी राजधानीत येतील. तसेच आपण तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्याही संपर्कात असल्याचे शरद यादव यांनी येथे पत्रकारांना सांगितले. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीश कुमार हेदेखील गुरुवारी नवी दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे.
भूसंपादन, कोळसा आणि खाण क्षेत्रासंबंधी केंद्र सरकारने संसदेत चर्चा घडवून आणली नाही याचा निषेध करीत यादव यांनी हे अध्यादेश ब्रिटिशांनी १८९४ साली केलेल्या कायद्यांपेक्षा भयानक असल्याचे म्हटले. त्यामुळे उद्योगपतींना कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय जमीन आणि खाणी संपादन करता येणार आहेत, असा आरोप त्यांनी केला. यातून सरकारने उद्योगपतींना पायघडय़ाच घातल्या आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी कोल इंडिया युनियनच्या संपालाही पाठिंबा व्यक्त केला.
नव्या भूसंपादन विधेयक सुधारणेत भूमी संपादन करताना लागणारी जनसंमतीची अट पाच मूलभूत क्षेत्रांसाठी शिथिल करण्यात आली.