६ एप्रिलपासून राजधानीत ‘जाणता राजा’चे महाप्रयोग; केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांकडून घोषणा

नुकत्याच दणक्यात झालेल्या शिवजयंतीने राजधानीमध्ये शिवरायांच्या नावाचा जयघोष झाला असतानाच आता दिल्लीकरांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचा रोमांचक अनुभव घेता येणार आहे. ६ एप्रिल ते १० एप्रिलदरम्यान थेट ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात ‘जाणता राजा’चे प्रयोग होतील.

या जंगी कार्यक्रमाची घोषणा केली ती केंद्रीय सांस्कृतिकमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी. या वेळी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार विनय सहस्रबुद्धे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आणि महाराष्ट्रभूषण हे महानाटय़ाचे सर्वेसर्वा बाबासाहेब पुरंदरे उपस्थित होते.

‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे आदर्श आहेत. शिवचरित्र हे भावी पिढीसाठी अतिशय आदर्शवत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढय़ासही शिवाजी महाराजांची प्रेरणा होती. त्यांचे जीवनकार्य प्रेरणादायी असून दिल्लीकरांना ते आता अनुभवण्यास मिळणार असल्याचा आनंद वाटतो,’’ असे महेश शर्मा यांनी सांगितले. त्यांच्याच हस्ते ऑनलाइन तिकीट विक्रीला प्रारंभ झाला.

सहस्रबुद्धे म्हणाले, तत्त्वज्ञ राजे असलेले शिवराय शूरवीर तर होतेच, सोबतच त्यांचे प्रशासन कौशल्यही आदर्शवत होते. देशास सुशासनाच्या वाटेवर नेण्यासाठी त्यांचे चरित्र हे आदर्श आहे. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने उपभोगशून्य स्वामी होते.

शिवशाहीर पुरंदरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र दिल्लीकरांपुढे मांडताना मला खूप आनंद होतो आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र हे जगभर पोहोचावे, अशी माझी इच्छा आहे.
या वेळी आयोजन समितीचे अध्यक्ष श्याम जाजू यांनी महानाटय़ाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’च्या माध्यमातून शिवचरित्र जगासमोर मांडले. त्यांचे कार्य फार मोलाचे आहे. त्यामुळे हे महानाटय़ देशातील सर्व भाषांमध्ये नेण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आम्ही प्रयत्न करू. ती आमची राष्ट्रीय जबाबदारी आहे..

– डॉ. महेश शर्मा, केंद्रीय सांस्कृतिकमंत्री