तामिळनाडूत दारूविरोधी प्रचार करणाऱ्या लोकगायकाला अटक केल्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री जयललिता यांनी विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांबाबत या गायकाने अभिरूचीहीन विधान केले होते त्यामुळे या गायकावर कारवाई केली नसती तर राज्याच्या प्रमुखाविषयी वाटेल ते बोलण्याचा पायंडा पडला असता हे विरोधकांनी लक्षात घ्यावे असे जयललिता यांनी सांगितले.
अद्रमुकच्या डॉ.नमाथु एमजीआर या मुखपत्रात अद्रमुकने कठोर भाषेत लेख लिहिला असून त्यात द्रमुक व इतर विरोधी पक्षांवर टीका केली आहे. गायक कोवन याला अटक केल्यावरून विरोधकांनी टीका केली असली तरी ते राजकीय अस्तित्वासाठी ही धडपड करीत आहेत असे या लेखात म्हटले आहे. कोवन याने मुख्यमंत्री जयललिता यांच्याबाबत अभिरूचीहीन विधाने केली ती प्रसारित केली, समाज माध्यमांवर टाकली त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली तर विरोधी पक्ष लोकशाही धोक्यात असल्याचा आरडाओरडा करीत असतील तर ते योग्य नाही.