मकर संक्रातीच्या निमित्ताने भाजप आणि नितीशकुमार यांच्यातील दुरावा आणखी कमी होण्याची चिन्हे आहेत. बिहारमध्ये मकर संक्रातीच्या कार्यक्रमात जनता दलाने (संयुक्त) भाजपला निमंत्रण दिले असून तीळगूळच्या निमित्ताने या दोन्ही पक्षातील संबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल अशी शक्यता आहे.

जदयूचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे कट्टर मोदीविरोधक म्हणून ओळखले जातात. भाजपने २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींची निवड करताच नितीशकुमार यांनी रालोआमधून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. यानंतर बिहार पूरग्रस्तांना गुजरातने दिलेली मदतही नितीशकुमार यांनी नाकारली होती. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा तडाखा जदयूलाही बसला होता.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जदयूने भाजपविरोधात एकेकाळचे कट्टरविरोधक असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केली. बिहारमध्ये जदयू, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस ही महाआघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली. महाआघाडीने सत्ता काबीज करण्यात यश मिळवले असले तरी राजदचे आमदार जास्त असल्याने लालूप्रसाद यादव यांचे सरकारमधील वजनही वाढले. मात्र नेमकी हीच बाब मुख्यमंत्री नितीशकुमार यांना फारशी रुचलेली नाही. जदयू आणि राजदमध्ये कटुता वाढत आहे. तर दुसरीकडे नितीशकुमार यांना आपल्या जुन्या मित्राचीही आठवण झाली आहे. नितीशकुमार यांनी नोटाबंदीचे समर्थन केले असून भाजप नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी पाटणामध्ये प्रकाशपर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना मंचावर स्थान दिले नव्हते. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी आता मकर संक्रातीच्या कार्यक्रमात थेट भाजपला निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मकर संक्रातीच्या निमित्ताने हे दोन्ही पक्ष आणखी जवळ येतील अशी आशा वर्तवली जात आहे.