आयआयटीमध्ये इंजिनिअरींगच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच JEE च्या महत्त्वाच्या तारखा उद्या ५ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. मात्र परीक्षेच्या केंद्राविषयी २१ ऑक्टोबरला विस्तृत माहिती मिळेल असे सांगण्यात आले आहे. ही सर्व माहिती jeemain.nic.in, nta.ac.in या दोन वेबसाईटवर ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. ६ ते २० जानेवारीमध्ये येणाऱ्या शनिवार-रविवारमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र त्याची नेमकी तारीख उदया जाहीर करता येणार आहे. ही तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले नेमके केंद्र आणि परीक्षेची वेळ समजू शकणार आहे. पहिला पेपर २ वेळांत असेल पहिली वेळ ९.३० ते १२.३० असेल तर दुसरी वेळ २.३० ते ५.३० अशी असेल. मात्र पेपर २ हा एकाच वेळेत ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

परीक्षेच्या अर्ज भरण्यात तुमच्याक़डून काही चूक झाली असेल तर ८ ते १४ ऑक्टोबरदरम्यान तुम्हाला चुका सुधारण्याची संधी मिळणार आहे. ३० सप्टेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. मात्र त्यामध्ये चूक झाली असल्यास ती सुधारता येणार आहे. याशिवाय २०१९ पासून होणाऱ्या परीक्षेच्या एकूण पद्धतीत बदल करण्यात आला आहे. आधी ही परीक्षा सीबीएसईतर्फे घेण्यात येत होती मात्र आता ती एनटीएतर्फे घेण्यात येणार आहे. तसेच ऑफलाईन घेतली जाणारी ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. आधी ही परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जात होती. मात्र आता ती जानेवारी आणि एप्रिल अशी वर्षातून २ वेळा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता एक जास्तीची संधी मिळणार आहे.