मॉडेल जेसिका लाल हिच्या हत्या प्रकरणातील खटल्यात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता व मॉडेल शायन मुन्शी व शस्त्रतज्ज्ञ पी. एस. मनोचा यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. या दोघांवर सत्र न्यायालयात खटला चालणार असून दोषी ठरल्यास त्यांना कमाल सात वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.
मुन्शी याच्यासह एकूण ३२ साक्षीदारांनी साक्ष फिरवल्याने सत्र न्यायालयाने या हत्याकांडातील आरोपींची निर्दोश  मुक्तता केली होती. मात्र, डिसेंबर २००६मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून प्रमुख आरोपी मनू शर्मा याला शिक्षा ठोठावली होती. खटल्यातील साक्षीदार उलटल्याचीही उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती व या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सरकारी पक्षाला दिले होते. सरकारी पक्षाने यापैकी १९ साक्षीदारांवर खटला चालवण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यापैकी मुन्शी व शस्त्रतज्ज्ञ प्रेमसागर मुनोचा यांच्यावर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कलम ३४० अन्वये सत्र न्यायालयात खटला चालवण्याचे आदेश खंडपीठाने दिले. आपल्या साक्षीतील काही भाग  न्यायालयाने शिक्षा सुनावताना विचारात घेतल्याचा मुन्शीचा दावाही न्यायालयाने फेटाळला. तर अंदलिब सेहगल, रूपसिंग व प्रेमसागर, इलेक्ट्रिशयन शीवशंकर दास तसेच प्रत्यक्षदर्शी जगन्नाथ झा यांच्यासह १७ साक्षीदारांना आरोपातून मुक्त करण्यात आले.

आधी तक्रार, मग हात वर
दक्षिण दिल्लीतील ‘टमिरड कोर्ट’ या रेस्टॉरंटमध्ये २९ एप्रिल १९९९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत हरयाणा काँग्रेसचे नेते विनोद शर्मा यांचा मुलगा मनू शर्मा याने जेसिका लाल हिची मद्य देत नसल्याच्या कारणावरून डोक्यात गोळी झाडून हत्या केली होती. या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या शायन मुन्शीने पोलिसांत पहिली तक्रार दाखल केली होती. मात्र, या हत्याकांडाच्या सत्र न्यायालयातील सुनावणीदरम्यान त्याने आपल्याला हिंदी समजत नसल्याचे सांगत पोलिसांत आपण तक्रार केली नसल्याची साक्ष दिली होती.