विमानामध्ये होणारे बिघाड आणि त्यामुळे करावे लागणारे इमर्जन्सी लँडिंग हे आपल्याकडे फारसे नवीन नाही. पण यामध्ये पायलट आणि हवाई वाहतुकीतील सर्वच कर्मचाऱ्यांचे कसब पणाला लागते. हवेत असताना विमानात बिघाड झाल्यावर शेकडो प्रवाशांचे आणि स्वत:चे प्राण वाचविण्याचे मोठे आव्हान या लोकांसमोर असते. अनेकदा हे आव्हान यशस्वीपणे पूर्णही केले जाते. नुकतीच अशीच एक घटना घडली असून त्यामध्ये ९६ प्रवाशांचे आणि ७ कर्मचाऱ्यांचे प्राण वाचविण्यात जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. हैद्राबादहून ९६ प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाने काही वेळातच इंदौर येथे इमर्जन्सी लॅंडिंग केले. हवेत उड्डाण करत असताना विमानाच्या इंजिनात अचानक बिघाड झाल्याने ही परिस्थिती ओढावली.

जेट एयरवेजचे बोईंग ७३७ एयरक्राफ्ट ३६ हजार फूट म्हणजेच ११ किलोमीटर उंचीवर ८५० मैल प्रती तास वेगाने चालले होते. त्यावेळी विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व ९६ प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. घडल्या प्रकाराबद्दल कंपनीने आपल्या प्रवाशांची माफी मागितली. कंपनीला आपली पत सांभाळायची असेल तर कोणत्याही प्रकारचे अपघात होऊन चालत नाही. त्यामुळे हवाई कंपन्यांवर एकप्रकारचा दबाव असतो. अपघात झाल्यास त्यांच्यावर कायमस्वरुपी चुकीची सेवा दिल्याचा शिक्का बसतो.