झारखंड झुंडबळी प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घटनेवर भाष्य करत या घटनेमुळे आपल्याला दु:ख झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी झारखंड झुंडबळी घटनेसंबंधी निषेध व्यक्त केला. झारखंड झुंडबळीतील आरोपींना कठीण शिक्षा झाली पाहिजे. घटनेचं दु:ख मलाही आहे. पण त्याचं राजकारण करणं चुकीचं आहे. या एका घटनेसाठी झारखंडची बदनामी केली जाऊ नये असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे.

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये चमकी तापाने होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचीही दखल घेतली. बिहारमधील चमकी ताप मृत्यू घटना आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सरकारच्या अपयशांपैकी हे एक आहे. मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे. लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी जनजागृती कऱण्याची गरज आहे. हे दुसऱ्या राज्यातही होऊ शकतं असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

निवडणूक देशाने हरली म्हणणं यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान नाही – नरेंद्र मोदी

यावेळी नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. ही निवडणूक देशाने हरली असं म्हणणं यापेक्षा मोठा लोकशाहीचा अपमान असू शकत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. अमेठीत भारताचा पराभव झाला का ? वायनाडमध्ये, रायबरेलीत भारताचा पराभव झाला का ? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. यावेळी त्यांनी २०१९ ची निवडणूक देशाच्या जनतेने लढली असंही म्हटलं. जनतेने सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवली असं त्यांनी यावेळी सांगितलं.

देशातील लोकांना विचार करायला लावणारी ही गोष्ट असून काँग्रेसचा पराभव म्हणजे देशाचा पराभव आहे का ? असा सवाल नरेंद्र मोदींनी विचारला. अहंकाराची एक मर्यादा असते अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. देशातील शेतकऱ्यांचाही अपमानही कऱण्यात आला. आपल्या देशातील शेतकरी बिकाऊ नाही असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं. प्रसारमाध्यमांमुळे निवडणूक जिंकली जाते का ? अशी विचारणा करताना मीडिया कोणी विकत घेऊ शकतं का ? असंही त्यांनी विचारलं.

देशात एक नवा आजार सुरु आहे. ईव्हीएमसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कधीकाळ आमचीही संख्या दोन होती. पण आमचा देशातील जनतेवर विश्वास होता. कष्ट करण्याची आमची तयारी होती. विश्वासाने आम्ही पुन्हा पक्ष उभा केला. हीच आपल्या नेतृत्त्वाची कसोटी असते. त्यावेली आम्ही रडत बसलो नाही. आम्ही प्रयत्न केले. पण जेव्हा स्वत:वर विश्वास नसते तेव्हा कारणं सांगितली जातात. आपल्या चुका स्वीकारण्याची तयारी नसणारे ईव्हीएमला दोष देत फिरतात अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

आम्हीदेखील ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती. पण जेव्हा स्पष्टता आली तेव्हा आम्ही त्याचा स्विकार केला असं सांगताना काँग्रेसनेच ईव्हीएमसंबंधी नियम तयार केले सांगत आम्ही सगळं केलं म्हणणाऱ्यांनी हेच केलं आहे असा टोला मोदींनी लगावला. तुम्ही विजय पचवू शकला नाहीत आणि पराभवही स्विकारत नाही आहात अशी टीका यावेळी नरेंद्र मोदींनी केली.

यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा एक देश एक निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. प्रत्येक प्रयत्नाचं कौतुक केलं पाहिजे. चर्चा तरी करावी असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. दरवाजे बंद केल्याने चर्चा होत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

नव्या भारताचा विरोध होत असल्याने मला आश्चर्य वाटत आहे. आपल्याला तो जुना भारत हवा आहे का जिथे फक्त घोटाळ्यांच्या बातम्या होत्या, रेल्वे आरक्षणासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागायचं, पासपोर्टसाठी महिनाभर वाट पहावं लागायचं, जिथे प्रत्येक गोष्टीसाठी मुलाखत घेतली जायची आणि त्यातून भ्रष्टाचार केला जायचा. देशातील जनतेला नवा भारत हवा आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार असं यावेळी नरेंद्र मोदींनी ठणकावून सांगितलं.

जनतेच्या निर्णयाचा गळा दाबण्याचा प्रयत्न होता कामा नये अशी टीका नरेंद्र मोदींनी केली. सकारात्मक विचार मांडा, आम्ही स्विकारण्यास तयार आहोत. कारण आम्हाला देशाचं भलं करायचं आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. झारखंड झुंडबळीतील आरोपींना कठीण शिक्षा झाली पाहिजे. घटनेचं दुख: मलाही आहे. पण त्याचं राजकारण करणं चुकीचं आहे. झारखंडची बदनामी केली जाऊ नये असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी सर्वांना प्रयत्न केला पाहिजे असंही यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं.

नरेंद्र मोदींनी शीख दंगलीचा उल्लेख करत ज्यांच्यावर आरोप करण्यात आले ते आजही त्यांच्या पक्षात आहेत अशी टीका केली. मी माझ्या पक्षातील नेत्यांनाही कोणतंही वादग्रस्त वक्तव्य न करण्याचा सल्ला देतो. सार्वजनिक आयुष्यात नियमांचं पालन होणं गरजेचं आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.