अवघ्या दोन वर्षांमध्ये ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’ कमाईच्या बाबतीत देशातील दुसरी मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे. महसुली उत्पन्नाच्या निकषात जिओने व्होडाफोनला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे. पहिल्या क्रमांकावर एअरटेल कायम असून आता जिओ आणि एअरटेलमधील अंतर बरेच कमी झाले आहे.
कमी पैशांमध्ये इंटरनेट सेवा आणि गावागावात पोहोचलेलं नेटवर्क यामुळे जिओच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे, परिणामी कंपनीच्या उत्पन्नामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. 4जी सेवा सादर केल्यानंतर गेल्या दोन वर्षांत महसुली उत्पन्नाच्या बाजारपेठेत ‘जिओ’च्या बाजारहिश्श्यात मोठी वाढ झाली आहे. जून २०१८ च्या तिमाहीत कंपनीचा बाजारहिस्सा २२.४ टक्क्यांवर पोहोचला. ट्रायच्या आकडेवारीनुसार मार्च २०१८च्या तिमाहीच्या तुलनेत जूनअखेर २.५३ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
महसुली उत्पन्नाच्या निकषाच्या जून २०१८ च्या तिमाहीनुसार एअरटेल ३१.७ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे, २२.४ टक्क्यांसह जिओ दुसऱ्या क्रमांकावर , तिसऱ्या क्रमांकावर व्होडाफोन १९.३ टक्के आणि आयडिया १५.४ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जिओ लवकरच एअरटेललाही मागे टाकेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 8:36 am