केरळमधील जिशा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी अमिरूल इस्लामला गुरूवारी एर्नाकुलम जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. अमिरूल हा आसाममधील स्थलांतरित कामगार असून मंगळवारी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. जिशा बलात्कार प्रकरणानंतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्त्रियांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अनेक आंदोलने झाली होती. त्यामुळे देशभरात हे प्रकरण गाजले होते.

न्यायालयाने मंगळवारी अमिरूल इस्लाम याला ३७६, ३०२, ४४९ आणि ३४२ या कलमांतर्गत दोषी ठरवले होते. या निकालानंतर जिशाच्या बहिणीने प्रतिक्रिया देताना म्हटले की, मला माझी बहीण परत मिळू शकणार नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयावर मी समाधानी आहे. मात्र, अमरूल फासावर लटकेल तेव्हाच आमच्या मनाला खऱ्या अर्थाने शांती मिळेल. जिशाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. त्या सर्वांची मी आभारी असल्याचे जिशाच्या बहिणीने म्हटले.

सरकारी पक्षाचे वकील एन.के. उन्नीकृष्णन यांनी दोषीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. जिशाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येमुळे संपूर्ण राज्य हादरले. त्यामुळे अमरूलला सर्वात कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना जनमानसात असल्याचे उन्नीकृष्णन यांनी सांगितले होते.

२८ एप्रिल २०१६ रोजी २७ वर्षांच्या जिशावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर केरळमध्ये जनक्षोभ निर्माण झाला होता. राज्याच्या विधिमंडळातही याचे जोरदार पडसाद उमटले. तब्बल ८० दिवस या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. पोलिसांकडून अमरूल इस्लामविरुद्ध १५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी डीएनए चाचणीद्वारे प्रकरणाचा छडा लावला. या संपूर्ण खटल्याची सुनावणी इन कॅमेरा झाली होती.