दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (JNU) रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणी आता बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील त्यांची मतं व्यक्त केली आहेत. बऱ्याच सेलिब्रिटींनी सोशल मीडियाचा आधार घेत त्यांची मत मांडली आहेत. यात अभिनेत्री तापसी पन्नूनेदेखील ट्विटरच्या माध्यमातून तिचं मत मांडलं होतं. मात्र काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. परंतु ट्रोल करणाऱ्यांना तापसीने सडेतोड उत्तर दिलं आहे.

चालू घडामोडी व सामाजिक,राजकीय मुद्द्यांवर वक्तव्य करणाऱ्या तापसीने अलिकडेच एक ट्विट केलं होतं. त्यावर “अरे आता मला एक आठवलं, तापसी काल तू जे ट्विट केलं होतं त्याचे पैसे तुला मिळाले की नाही? असा खोचक सवाल एका नेटकऱ्याने तापसीला केला. यावर तापसीने भन्नाट उत्तर दिलं.


“नाही ताई, माझी विवेकबुद्धी खरेदी करण्यासाठी तुझे विधान खूप संकुचित मनोवृत्तीचे आहे. मी असे लहानसहान करार करत नाही. याच कारणामुळे मी तो करार रद्द केला. पुढच्या वेळी कोणतंही ट्विट करताना प्रगल्भ विचार कर आणि ट्विट कर, असं सडेतोड उत्तर तापसीने दिलं.

काय होतं तापसीचं ट्विट

तापसीने अलिकडेच ट्विट केलं होतं. यात दोन माणसं एकमेकांशी मारामारी करताना दिसत होते. या दोघांपैकी एक व्यक्ती तापसी असल्याचं या फोटोवर लिहीलं होतं. ते पाहिल्यानंतर तापसीने हा फोटो शेअर केला आणि “ओह नो! मी यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे दिले होते. मात्र तुम्ही काम पूर्ण करु शकला नाहीत. त्यामुळे यापुढे पोस्ट करताना मी तुमचे पैसे कापणार”, असं मजेशीर कॅप्शन या फोटोला दिलं होतं. तिचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर जेएनयूमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याविषयी ट्विट करण्यासाठीदेखील तिने पैसे घेतल्याचं म्हटलं जात होतं. तसंच ती भारतीय आहे की नाही असेही प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र या साऱ्यावर तापसीने सडेतोड उत्तर दिलं आहे.