दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. विद्यापीठामधील प्रशासकीय इमारतीसमोर बिर्याणी शिजवून संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विद्यार्थ्याला सहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार प्रोक्टर (विद्यापीठातील शिस्तपालन अधिकारी) कौशल कुमार शर्मांनी ही कारवाई केली आहे.

शर्मांनी काढलेल्या आदेशानुसार २७ जून रोजी विद्यापिठाच्या अरेबिक आणि आफ्रीकन अभ्यासक्रम केंद्राचा विद्यार्थी असणाऱ्या मोहम्मद आमिर मलिक नावाच्या विद्यार्थ्याने प्रशासकीय इमारतीसमोरच्या जिन्याजवळ बिर्याणी शिजवली. तर इतर विद्यार्थ्यांनी ती बिर्याणी खाल्ल्याने त्या विद्यार्थ्यावरही कारवाई करण्यात आली. मागील चार वर्षांपासून विद्यापीठाच्या वस्तीगृहात वास्तव्याला असणाऱ्या मलिक याने नियमांचे उल्लंघन केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नियम मोडल्याप्रकरणी सहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडाची ही रक्कम भरण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) हा बीफ बिर्णायीचा प्रकार असल्याचे आरोप केला आहे.