न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा निर्वाळा

जेएनयू विद्यापीठ संकुलात ९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या वादग्रस्त कार्यक्रमाच्या चार व्हिडीओ फिती तपासणीसाठी गांधीनगर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या होत्या त्या खऱ्या असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे.

तथापि, व्हिडीओ फितींच्या दुसऱ्या संचाबाबतचा अहवाल अद्याप प्रलंबित असून त्यामध्ये काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या फितींचाही समावेश आहे. या फिती सीबीआयच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत.

गांधीनगरमधील प्रयोगशाळेतून आम्हाला चार व्हिडीओ फितींबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या फिती खऱ्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर अन्य फिती तपासण्याचे काम सुरू आहे, असे विशेष पोलीस आयुक्त  (विशेष कक्ष) अरविंद दीप यांनी सांगितले.

या व्हिडीओ फिती सुरक्षारक्षक आणि अन्य विद्यार्थ्यांच्या भ्रमणध्वनीमधील कॅमेऱ्याने चित्रित करण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळेत संबंधित वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्याची, स्टोरेज कार्डाची आणि वायरींची तपासणी करण्यात येत आहे. येत्या आठवडय़ात हा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे, असे दीप यांनी सांगितले.

या खऱ्या व्हिडीओ फितींमधून भारतविरोधी घोषणा देणाऱ्यांना ओळखण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.