मध्य प्रदेशात न्यायाधीश आणि त्यांच्या मुलाचा विषारी चपाती खाल्ल्याने मृत्यू झाल्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक महिला आणि मांत्रिकाचाही समावेश आहे. जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश महेंद्र त्रिपाठी आणि त्यांच्या ३३ वर्षीय मुलाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. जेवणानंतर त्यांना अस्वस्थ दोन वाटू लागलं होतं. अखेर दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी याप्रकरणी स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या संध्या सिंह नावाच्या महिलेला अटक केली आहे. संध्या सिंह हिनेच न्यायाधीशांच्या कुटुंबाला विषारी पीठ दिलं होतं. त्यांच्या घरात एकोपा राहावं यासाठी आपण पूजा केल्यानंतर हे पीठ दिल्याचा तिचा दावा आहे.

न्यायाधीशांनी २० जुलै रोजी पीठ घरी आणलं होतं. त्याच दिवशी त्यांच्या कुटुंबाने जेवणासाठी त्या पीठाच्या चपात्या केल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त न्यायाधीश आणि त्यांच्या मुलानेच चपात्या खाल्ल्या तर पत्नीने फक्त भात खाल्ला होता. जेवल्यानंतर न्यायाधीश आणि त्यांच्या मुलाला उलट्या होऊ लागल्या. २३ जुलै रोजी त्यांची प्रकृती अजून खराब झाल्यानंतर अखेर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

२५ जुलै रोजी दोघांनाही प्रकृती खालावल्याने नागपूरमधील रुग्णालयात हलवण्यात आलं. नागपुरात पोहोचल्यानंतर त्याच दिवशी मुलाचा आणि दुसऱ्या दिवशी न्यायाधीशांचा मृत्यू झाला. न्यायाधीशांचा लहान मुलगाही चपाती खाल्लायनंतर आजारी पडला होता, पण आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

संध्या सिंहकडून हत्येचा प्रयत्न झाल्याच्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. संध्या सिह न्यायाधीशांना आधीपासूनच ओळखत होती. न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्याचा कट तिने आखला होता असा पोलिसांचा आरोप आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “न्यायाधीश बेतूल येथे वास्तव्यास आल्याने संध्या सिंह त्यांना भेटू शकत नव्हती. गेल्या चार महिन्यांपासून ती त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. याच रागात तिने हत्येचा कट आखला होता. संध्या सिंहने न्यायाधीशांना सर्व समस्या सोडवण्यासाठी पूजा करायची असून घऱातील गव्हाचं पीठ देण्यास सांगितलं होतं”.

पोलिसांनी सर्वात आधी संध्या सिंह आणि तिच्या चालकाला अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर अजून तिघांना अटक करण्यात आली. महिलेला सल्ला देणाऱ्या मांत्रिकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना त्याच्याही मुसक्या आवळल्या आहेत.