आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेला गुरू उद्या अतिशय मोठा व प्रकाशमान दिसणार आहे. खगोलनिरीक्षकांसाठी ही अपूर्व संधी आहे.
गुरू ग्रहाभोवतीही शनीप्रमाणे कडी असून तो पृथ्वीच्या सर्वात जवळ येत असल्याने मोठा व प्रकाशमान दिसणार आहे, असे प्लॅनेटरी सोसायटी ऑफ इंडियाचे एन.रघुनंदन कुमार यांनी सांगितले. सूर्यास्तानंतर पूर्व क्षितिजावर तो नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकेल. रात्रभर तो दर्शन देणार असून मध्यरात्री तो दक्षिण दिशेला दिसेल. गुरू हा सौरमालेतील सर्वाधिक नैसर्गिक उपग्रह असलेला ग्रह असून तो उद्या रात्री प्रतियुतीत असेल. तो पृथ्वीवरून सूर्याच्या विरूद्ध दिशेला असणार आहे. प्रतियुतीत कुठलाही ग्रह हा पूर्ण प्रकाशित दिसतो व चकतीसारखा भासतो. दर १३ महिन्यांनी गुरूची प्रतियुती होत असते. गेल्यावेळी २९ ऑक्टोबर २०११ रोजी तो प्रतियुतीत होता व यापुढे ६ जानेवारी २०१४ रोजी तो प्रतियुतीत असेल.